जळगावमध्ये काँग्रेससमोर नवीन आव्हान ? वाचा सविस्तर

जळगाव : राज्यातल पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात जळगाव जिल्हा कॉग्रेसमध्ये मात्र उघड गटबाजी सुरू असल्याचे दसून आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर होत असलेल्या गटबाजीमुळे जिल्हा कॉग्रेससमोर नवीन आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हा कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तसेच जळगाव जिल्हा प्रभारी म्हणून प्रतिभा शिंदे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्षांना डावलून शहर कॉग्रेसतर्फे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ नेते डॉ.ए.जी. भंगाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. यावर केंद्रासह राज्यातील सर्व नेत्यांचे फोटो आहेत.

लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला राज्यात क्रमांक एकचे चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात कॉग्रेस बळकट होत आहे. जळगाव जिल्ह्यातही दोन दिवसाअगोदर रावेर येथील कॉग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी खिरोदा येथे अत्यंत चांगला कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास प्रदेशचे नेतेही तसेच महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थीत होते. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेसमध्ये बळकटीकरण सुरू असल्याचे दिसत होते.

मात्र आता शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांना डावलून कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने पक्षात उघड गटबाजी असल्याचे आता दिसून आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर होत असलेल्या गटबाजीमुळे जिल्हा कॉग्रेससमोर नवीन आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

कॉंग्रेस भवनात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची आपणास कोणतीही माहिती नाही, आपण सोमवारी दिवसभर कॉग्रेस भवनात होतो, त्याबाबत आपल्याशी कोणीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत आपण काहीही सांगू शकत नाही.
= प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष कॉग्रेस कमेटी जळगाव

प्रतिभा शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तसेच जळगाव शहर व ग्रामीणच्या निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहर कॉंग्रेसतर्फे हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीणचा काहीही संबंध नाही, त्यांनी त्यांचा कार्यक्रम आयोजित करावा. ज्यावेळी ग्रामीणचा कार्यक्रम होतो त्यावेळी महानगराध्यक्षाला पाचारण केले जात नाही. आम्ही त्यांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे गटबाजीचा कोणताही संबंध नाही.
= श्याम तायडे, महानगराध्यक्ष,
शहर जिल्हा कॉग्रेस कमेटी जळगाव