बेंगळुरू: गेल्या काही आठवड्यांपासून बेंगळुरूमध्ये तीव्र पाणी संकट आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पक्षाने ‘टेक सिटी’ला ‘टँकर सिटी’ बनवले आहे.
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर बेंगळुरूच्या सर्व जागांवर २६ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानाच्या काही दिवस आधी शहरातील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांना देशाला पुढे न्यायचे आहे आणि काँग्रेसवर “गुंतवणूक विरोधी, उद्योजकता विरोधी, खाजगी क्षेत्र विरोधी, करदात्या विरोधी, संपत्ती निर्माण विरोधी” असल्याचा आरोप केला.
काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, नादप्रभू केम्पेगौडा यांनी बेंगळुरूला एक सुंदर शहर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, काँग्रेस सरकारने अल्पावधीतच येथील परिस्थिती बिघडवली. काँग्रेसने टॅक्स सिटीचे टँकर सिटीमध्ये रुपांतर करून पाणी माफियांच्या ताब्यात दिले आहे. शेती असो वा शहरी पायाभूत सुविधा, सर्वत्र बजेट कमी केले जात आहे, काँग्रेस सरकारचे लक्ष केवळ भ्रष्टाचारावर आहे. बेंगळुरूच्या लोकांच्या समस्येवर नाही. कर्नाटकात केवळ केंद्र सरकारचे प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.