लाडकी बहिण योजनेत काँग्रेसचे लोकं भरतायतं चुकीचे फॉर्म ! सभागृहात राम कदमांनी केली पोलखोल

मुंबई : लाडकी बहिण योजनेत काँग्रेसचे लोक चुकीचे फॉर्म भरून देत आहेत, अशी पोलखोल भाजप नेते राम कदम यांनी सभागृहात केली. तहसील कार्यालयात लाडली बहिण योजनेसाठीही कागदपत्र तयार करण्याचे काम सुरु असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेला लागणारी कागजपत्रे मिळण्यात अडचण येत आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राम कदमांनी ही पोलखोल केली.

नाना पटोले म्हणाले की, “सध्या शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल यासाठी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात लाडली बहिण योजनेसाठीही कागदपत्र तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने कागदपत्र मिळत नाही आणि त्यांच्या प्रवेशाचा प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे ऑफलाईन व्यवस्था करता येईल का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावर राम कदम म्हणाले की, “घाटकोपरमध्ये एका घरी तीन बहिणी आहेत. त्यांना महिन्याला साडे सात हजार रुपये मिळणार आहेत. पण तुमचे कार्यकर्ते तिथे जाऊन चुकीचा फॉर्म भरत आहेत. उबाठा आणि शरद पवार गटही चुकीचा फॉर्म भरत आहेत. १५ ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नये आणि तसं झाल्यास तुम्हाला सत्ताधारी पक्षाविषयी बोंबलत बसायचं आहे, यासाठी चुकीचा फॉर्म भरत आहेत. तुम्हाला चांगल्या योजनांमध्ये राजकारण करायचं आहे. गोरगरीब बहिणीला पैसे मिळत असतील तर तुम्हाला काय अडचण आहे? संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना फसली पाहिजे असा तुमचा दुर्दैवी प्रयत्न आहे,” असा आरोप राम कदम यांनी केला आहे.