काँग्रेसचे तीन ते चार मतं फुटणार यावर आजही ठाम ! या काँग्रेस आमदारानेच केला दावा

मुंबई : काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार यावर मी आजही ठाम आहे, असा दावा काँग्रेचेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. कैलास गोरंट्याल यांनी विधानपरिषदेच्या मतदानावेळी काँग्रेसचे चार आमदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज मतदानाच्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

कैलास गोरंट्याल म्हणाले की, “काल जे मी बोललो त्यावर आजही ठाम आहे. ज्यांच्यावर शंका होती ते दोन सदस्य काल बैठकीत उपस्थित होते. त्यामुळे मी मारलेला तीर यशस्वी झाला आहे, असं मला वाटतं. आणखी दोन लोकांचं काय होणार याची वाट बघणार आहे,” असे ते म्हणाले.

काल काय म्हणाले?
कैलास गोरंट्याल यांनी काल (गुरुवारी) विधानपरिषद निवडणूकीबाबत एक मोठा दावा केला होता. ते म्हणाले की, “हॉटेल पॉलिटिक्समध्ये अजित पवार आणि शिवसेनेचे आमदार घेऊन गेले. पण आमच्या काँग्रेसचं काहीही नाही. फक्त संध्याकाळी जेवण आहे आणि रमेश चेन्निथला येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. काही तीन चार आमदारांवर शंका आहे त्यांची व्यवस्था आम्ही करणार आहोत. आमच्या उमेदवाराला किंवा आमच्या सहकारी मित्राला दगाफटका होणार नाही याची रणनिती आम्ही आखणार आहोत.”

या आमदारांबद्दल बोलताना ते म्हणाले की, “ज्याचा बाप राष्ट्रवादीत गेला, ज्याचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला आहे आणि एक आंध्र आणि नांदेडच्या बॉर्डरवरचा असे चार आमदार फुटण्याची शक्यता आहे. त्यांचं काय करायचं याबाबत आम्ही ठरवणार आहोत,” असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.