राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या राम मंदिरावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपुरात युवक काँग्रेसने आंदोलन केलं होतं. मात्र अचानक पुकारलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांसह जेमतेम ५ ० ते ६ ० कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनीच पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळालेले होते.
यामुळे युवक काँग्रेसचे हे आंदोलन फसल असल्याचेही बोललं गेल्याने गैरहजर राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करत तडकाफडकीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील 60 पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याने संतप्त झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कार्यपद्धतीवर उघड टीका करणाऱ्या चार पदाधिकाऱ्यांना संघटनेतून निष्कासित करण्यात आले आहे. युवक प्रदेश काँग्रेसने उपाध्यक्ष तनवीर अहमद, सरचिटणीस अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना बुधवारी तात्काळ प्रभावाने कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले आहे. या चौघांवर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
निष्कासित पदाधिकाऱ्यांनी पुन्हा कुणाल राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.देशभर संविधान सभा घेऊन भाजप पक्षाविरूद्ध रान उठविणाऱ्या राहुल गांधीच्या विचारांनी त्यांचीच पक्ष संघटना तरी चालते का, असा सवाल करत असा सवाल करत युवक काँग्रेसमधून पदमुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी व पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
पक्षात प्रत्येकाला संवैधनिक दृष्टीने आपले मत, म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो, मात्र वैचारिक स्वातंत्र्याचा तो अधिकारच संपुष्टात आणून थेट पक्षातून हकालपट्टी केल्याने राहुल गांधीच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस संघटनेच्या अध्यक्षाला तरी लोकशाही आणि संविधानाचा विचार कळला का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.