‘हे’ महाविकास आघाडीचे षडयंत्र, फडणवीसांचा विरोधकांवर आरोप

पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेऊन ते सबमिटच करायचे नाही, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यातून महायुती सरकार विरोधात महिलांच्या मनात रोष निर्माण करुन तुम्ही फॉर्म भरुन देखील सरकारने पैसे दिले नाहीत, असे चित्र निर्माण करायचे असल्याचे स्पष्ट केले. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.

हे अधिवेशन श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला प्रकृती अस्वास्थ्यामुळे नितीन गडकरी अनुपस्थित असल्याने गडकरींऐवजी फडणवीस यांनी उद्घाटन सत्राचे समारोप भाषण केले.याप्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह राज्यातील मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एखाद्याच्या लग्नातही आपल्या योजनांची माहिती सांगावी, असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकसभेच्या घटलेल्या जागांमागील कारणे विषद करताना विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर न देणे ही चूक आहे. तसेच विरोधकांचा फुगा विधान परिषद निवडणूक निकालांत आपण फोडला असून विधानसभा निवडणुकांतही त्याची पुनरावृत्ती करायची असल्याचे आवाहन केले.