धुळे तहसीलचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात

धुळे : अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेले ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईनंतर सोडून देण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून दोन हजारांची लाच फोन पे वर स्वीकारणाऱ्या धुळे तहसील कार्यालयातील शिपायाला धुळे एसीबीने अटक केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईन लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.

नारायण पोपट फुलपगारे (धुळे) असे अटकेतील आरोपी शिपायाचे नाव आहे. तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळू आढळल्याने जप्त करण्यात होते व अपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. एक लाख ३० हजार ५०० रुपयांचा दंड ६ जून २०२४ रोजी चलनाद्वारे भरल्यानंतर तहसीलमध्ये पावती सादर करण्यात आली. तहसील कार्यालयात ट्रॅक्टर घेण्यासाठी गेल्यानंतर शिपाई फुलपगारे याने ट्रॅक्टर सोडण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली होती व याबाबत ७ जून रोजी तक्रार नोंदवण्यात आली. लाच पडताळणीत आरोपीने दोन हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले व २४ रोजी तक्रारदाराकडून आरोपीने फोन पे द्वारे लाच स्वीकारली. लाच स्वीकारल्यानंतर आरोपीला पाच वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली व त्याच्याविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यांनी यशस्वी केला सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.