Nagpur News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांच्या जामठा येथील बंगल्यावर तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची उघडकीस आली. हे कृत्य करणारे पोलीस कर्मचारी सध्या गंभीर जखमी झाले असून ते रुग्णालयात मृत्यूची झुंज देत असल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीमध्ये तैनात असलेले पोलीस कर्मचारी विशाल तुमसरे यांनी आज सकाळी स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. स्वतः पोलीस अधीक्षकांनी विशाल तुमसरेला एम्स रुग्णालयात नेऊन दाखल केले असून सध्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहे. तर त्यांची स्थिती गंभीर असल्याचेही बोलले जात आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठं नुकसान
धक्कादायक बाब म्हणजे शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत मोठं नुकसान झाल्यामुळे विशाल तुमसरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ हर्ष पोद्दार यांनी दिली. तसे सुसाईड नोट त्याच्या डायरी मध्ये सापडल्याचे ते म्हणाले.दरम्यान या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशाल यांना पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांनी शेअर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला होता. मात्र, त्यात बुडल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.