रामायणाचा सद्य:स्थितीत संदेश

कानोसा

 

– अमोल पुसदकर 

 

आज शेकडो वर्षांनंतर सुद्धा  रामायणाची समाजमनावरची मोहिनी कायम आहे. जगातल्या जवळपास सर्वच भाषांमध्ये रामायणाचे भाषांतर झालेले आहे. रामलीलांच्या माध्यमातून सुद्धा रामकथेतील पात्रांना जिवंत करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी केला जात असतो. ज्यावेळेस रामायणाची मालिका टीव्हीवर दाखवली जात होती त्यावेळेस रस्ते अक्षरश: ओस पडायचे आणि लोक टीव्हीसमोर खिळून बसायचे. एकदा एक मनुष्य बाहेर काही कामाकरिता गेलेला होता. परंतु त्या कामाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला व रामायणाची वेळ झाली. त्याला राहावले नाही. त्याने एका ठिकाणी आपली सायकल लावली व एका घरी टीव्ही चालू होता. त्याला वाटले की रामायण नक्कीच चालू असेल आणि त्याने डोकावून पाहिले तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे टीव्हीवर रामायण लागलेले होते. त्या घरातील व्यक्तीने त्याला घरात बोलावले व बसायला खुर्ची दिली.

 

थोडा वेळ गेल्यावर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की ज्या घरी तो बसला होता, ते घर एका मुसलमानाचे होते. त्याला फार आश्चर्य वाटले. त्याने त्या घरमालकाला विचारले की, आपण मुसलमान असून सुद्धा आपल्या घरी रामायण सुरू आहे हे कसे काय? तर तो म्हणाला, आपल्या इतिहासामध्ये तर नुसत्या लढाया आहेत. याने त्याला मारले, त्याने याला मारले हे सगळीकडे लिहिलेले आहे. सगळीकडे रक्तपातच आहे. परंतु आपल्याला नैतिकता आणि जीवनमूल्य जर कुठे बघायचे असेल तर ते आपण रामायणात बघू शकतो. म्हणून आमच्या घरी आम्ही सगळे  रामायण बघतो. हा रामायणाचा प्रभाव समाजमनावरचा आहे. परंतु हा प्रभाव कशामुळे निर्माण झाला व तो आजही का बरं टिकून आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. यज्ञाचा विध्वंस करणार्‍या त्राटिका व सुभाहू या राक्षसांचा रामाने वध केला. रामाची समयसूचकता किती होती व त्याची समज किती प्रचंड होती, यापासून आजच्या तरुण पिढीने बोध घेण्याची आवश्यकता आहे. मोबाईलमध्ये हरवून बसलेल्या आपल्या तरुण पिढीने रामाकडे बघितले पाहिजे की, त्यांच्याच वयाच्या रामामध्ये किती परिपक्वता होती.

 

राम त्यावेळेस दशरथाला कैदेत टाकून अयोध्येचे राज्य घेऊ शकला असता. परंतु रामाने पितृआज्ञेला प्राधान्य दिले व तो वनामध्ये जाण्यासाठी सिद्ध झाला. वनामध्ये जाताना राम सीतेला म्हणतो की, वनात जंगली प्राणी आहेत. नरभक्षक राक्षस आहेत. तुला तेथे भीती वाटेल. त्यामुळे तू वनामध्ये येऊ नकोस. मी व लक्ष्मण आम्ही दोघेच वनवासात जातो. त्यावेळेस सीता फार सुंदर उत्तर देते. सीता म्हणते, ज्याने  शिवधनुष्य तोडले होते अशा पराक्रमी माणसाला माझ्या वडिलांनी आपली कन्या दिलेली आहे. तो पराक‘मी अयोध्येचा युवराज आपल्या पत्नीचे नरभक्षक राक्षसांपासून व प्राण्यांपासून रक्षण करू शकत नाही का? सीतेच्या या प्रश्नावर राम निरुत्तर होतात व सीतेला सुद्धा वनामध्ये चलण्याची अनुमती देतात. सीता म्हणते, जेथे राघव तेथे सीता. वनात कंदमुळे, फळे खाऊन आपल्याला राहावे लागले तरी चालेल, संकटांचा सामना करावा लागला तरी चालेल, परंतु माझा पती जिथे आहे तिथेच मी राहील. अशा पद्धतीचा निश्चय सीता बोलून दाखवते. यावरून आजच्या तरुणींनी सुद्धा खूप मोठा संदेश ग‘हण करण्याची आवश्यकता आहे. आजकाल सगळीकडे तरुणांना खाजगी नोकर्‍या कराव्या लागतात. ज्यांना कमी पगार आहे त्यांना मुली मिळत नाही व मिळाल्या तरी सुद्धा कमी पगारात त्यांचे भागत नाही. अनेक वेळा असे विवाह टिकतसुद्धा नाहीत. अशा वेळेस तरुणींना सीतेचे वचन ‘जेथे राघव तेथे सीता’ हे खूपच मार्गदर्शक आहे. वनामध्ये जाण्यापूर्वी राम कौसल्या मातेला म्हणतात की, मी आता वनामध्ये चाललो आहे.

 

 

आता राजा भरत होणार आहे. भरत वयाने लहान असला तरीही तो राजा आहे, हे तू लक्षात ठेव व तुलाही त्याच्या आज्ञेत राहावे लागेल हे समज. मुले मोठी झाल्यावर त्यांच्याकडे पैसा, अधिकार आल्यावर आई-वडिलांनी मुलांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे व स्वत:मध्येही बदल केले पाहिजेत. जेणेकरून घरातील वादविवाद टाळता येईल. राम, लक्ष्मण, सीता हे वनवासात राहिले. त्यांनी कंदमुळे, फळे खाल्ली. तिथल्या सर्व अडीअडचणींचा व संकटांचा स्वीकार केला यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की, आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहीलच असे नाही. आपल्या दैवाला दोष न देता माणसाने आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढला पाहिजे व आपले जीवन आनंदाने जगले पाहिजे. हे रामाच्या वनवासावरून आपल्या लक्षात येते. भरत ज्यावेळेस  रामचंद्रांना वनवासातून परत नेण्यासाठी येतो त्यावेळेस राम वडिलांच्या आज्ञेसाठी मी अयोध्येस परत येऊ शकत नाही असे सांगतात. त्यावेळेस भरत म्हणतो की, चौदा वर्षे पूर्ण झाल्यावरचा सूर्यास्त होण्यापूर्वी जर रामा, तू अयोध्येत परत आला नाहीस तर मी अग्निकाष्ठ भक्षण करून हे जीवन संपवीन. राम आणि भरताचे प्रेम हे आजच्या काळातील भावा-भावांसाठी सुद्धा खूप आदर्श आहे. कारण एक फूट जागेकरिता किंवा शेतीच्या एखाद्या तुकड्याकरिता आज आपण भावाभावांमध्ये अबोला किंवा मारामार्‍या बघतो. आजच्या युगातील भावांकरिता राम आणि भरताचे प्रेम हे आदर्श ठरू शकते. रामाने वानरराज सुग‘ीवाशी मैत्री केलेली आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की, प्रसंग आला असता जो जिथे बलवान आहे त्याच्याशी आपल्याला मैत्री करावी लागू शकते व त्याचे साहाय्य आपले कार्य सिद्ध करण्यासाठी घ्यावे लागू शकते.

 

 

रामाने वानरांचे सैन्य उभारले. म्हणजे मिळेल त्या साधनांचा उपयोग करून माणसाने आपला पराक‘म गाजविला पाहिजे हे यावरून आपल्या लक्षात येते. सोन्यासारखे दिसणारे हरिण असत नाही ही गोष्ट राम, लक्ष्मण, सीता या सर्वांनाच माहिती होती. पण तरीही सीतेने कांचनमृगाचा हट्ट केला.  राम कांचनमृगाच्या पाठीमागे गेल्यावर रावणाने सीतेचे हरण केले व सीतेला संकटांना तोंड द्यावे लागले. रावण सीतेला पळवून नेत असताना तिने आपले दागिने विमानातून जमिनीवर फेकले. तिचा उद्देश हाच होता की, कदाचित या दागिन्यांचा माग काढत राम-लक्ष्मण माझ्यामागे येऊन पोहोचतील. संकटाच्या प्रसंगी सुद्धा महिलांनी आपली सद्सदविवेकबुद्धी वापरून कार्य केले पाहिजे हा संदेश सीतेवरून आपल्याला लक्षात घेता येईल. परंतु कांचनमृगाचा हट्ट सीतेला भोवला. त्यामुळे तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. रावणाने सीतेवर त्याच्याशी लग्न करण्यासाठी अनेक प्रकारे दबाव टाकला. तरीही सीतेने त्याला सांगितले की, मी विवाहित आहे. माझा पती जिवंत असताना मी दुसर्‍या पुरुषाचा विचार देखील करू शकत नाही. यावरून मुलींनी व महिलांनी योग्य तो संदेश ग‘हण केला पाहिजे. ‘नाही म्हणजे नाही’ असे ठामपणे सांगण्याची सवय महिलांनी व मुलींनी लावून घेतली पाहिजे. एक सीता रावणाच्या ताब्यात असून सुद्धा जर त्याला नाही म्हणू शकली तर आपण सुद्धा अनेक प्रकारचे मोह समोर असतानाही नाही म्हणणे शिकले पाहिजे. यावरून कुठलेही सांसारिक मतभेद किंवा इतर प्रसंग निर्माण होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

 

 

सीतेचा रामाच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास होता. तिला खात्री होती की, राम समुद्र ओलांडून लंकेला येतील व तिची सुटका करतील. महिलांनी सुद्धा आपल्या पुरुषांच्या ताकदीवर व कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे व धीर धरला पाहिजे. जसा सीतेने धरला होता. हनुमंताने रावणाची सुवर्णमयी लंका जाळली. लंकादहन केले.  सीतेला विश्वास दिला व तो रामाकडे परत आला. त्यावरून आपल्या असे लक्षात येते की, पापाची लंका कितीही मोठी व वैभवसंपन्न असली तरीसुद्धा तिचे दहन झालेच पाहिजे. पापाचे साम्राज्य हे एक ना एक दिवस कोसळणारच आहे. हा संदेश आपण ग्रहण केला पाहिजे. रावणाच्या वधानंतर बिभीषण रामाला लंकेमध्येच राहण्याचा आग्रह करतात. त्यावेळेस राम बिभीषणाला लंकेचे राज्य देतात व त्याला म्हणतात ही, लंका सोन्याची जरी असली तरीही मला हिच्यापेक्षा माझी माता व माझी जन्मभूमी अयोध्या हीच अधिक प्रिय आहे. आज भारतातील अनेक तरुण विदेशामध्ये शिक्षण घ्यायला जातात व तिकडेच रमून जातात, तिकडलेच होऊन जातात. अशा तरुणांनी रामाचा हा संदेश लक्षात घेतला पाहिजे की अमेरिका कितीही वैभवसंपन्न असली तरीही सुद्धा जन्मभूमी भारत व आपली माता हेच श्रेष्ठ आहे व यांच्यासाठी कार्य केले पाहिजे.  रामायणातील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला संदेश देणारा आहे. जीवनामध्ये पथप्रदर्शक आहेत म्हणून हजारो वर्षांनंतर सुद्धा रामायण आजही वाचले जाते. केवळ पुण्यप्राप्तीकरिता रामायण वाचू नये तर जीवनामध्ये त्याचे अनुसरण करण्यासाठी रामायणाचा उपयोग व्हावा. रामायण हे दिव्य महाकाव्य आहे. जनतेने त्याला एका ठेवीप्रमाणे जपले पाहिजे व जीवनामध्ये धारण केले पाहिजे असे वाटते.

 

– 9552535813