---Advertisement---
जळगाव : धरणगाव येथील क्रांतिवीर खाज्याजी नाईक स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात दाखल झाले. त्यानंतर ते लगेच धरणगावकडे रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यासमोर एका ठेकेदाराने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. संजय वराडे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस कर्मचाऱ्याकडून छळ होत असल्याचा आरोप
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अतुल वंजारी यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप ठेकेदार संजय वराडे यांनी केला आहे. तसेच पोलीस कर्मचारी अतुल वंजारी हा दुसरा वाल्मीक कराड असल्याचा आरोपही संजय वराडे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री लगेचच मुंबईकडे होणार रवाना
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, मंगलप्रभात लोढा उपस्थित आहेत. शुक्रवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालय व खाज्याजी नाईक स्मारकाच्या उद्घाटन आटोपून मुख्यमंत्री लगेचच मुंबईकडे रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी १०.४० वाजता धरणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन, ११ वाजता खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन, ११.१० वाजता कला, विज्ञान महाविद्यालयाच्या कार्यक्रम स्थळी आगमन, त्यानंतर गोद्री प्रेरणा स्थळाचे ऑनलाइन उद्घाटन व मुख्य कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १२ वाजता जळगाव विमानतळाकडे रवाना होऊन दुपारी १.२० मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना होणार आहेत.
---Advertisement---