आमचा हिस्सा द्या! मतदानासाठी मिळालेल्या पाकीटच्या हिस्यावरून वाद

यावल : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याची चर्चा झाली होती. त्यातच तालुक्यातील भालोद येथे दुध संघाकडून मतदानाचा हक्क प्राप्त संचालकाकडे दुध संघाचे दुध उत्पादक सभासद पोहोचले, त्यांनी तुम्हाला मिळालेल्या पाकीटातील रक्केमतुन आम्हाला आमचा हिस्सा द्यावा, अशी मागणी करीत खळबळ उडवून दिली. शिवाय त्याबाबतची व्हिडिओ क्लीप माध्यमांमध्येही व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

तालुक्यातील भालोद येथील दुध उत्पादक सहकारी संस्थेने नुकत्याच पार पडलेल्या दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीकरीता दिलीप हरी चौधरी यांच्या नावाने मतदानाचा ठराव केला होता. रविवारी गावात उफाळलेल्या वादात संचालकांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार देतांना मतदानासाठी जे काही पाकिट येईल त्यातील वाटा दुध उत्पादकांना देण्यात येईल, असे ठरले होते. मतदान होऊन अनेक दिवस उलटून गेले तरीदेखील वाटा न मिळाल्याने रविवारी दुध उत्पादक एकत्र आले व त्यांनी गावातील दुध संघा समोरचं दिलीप चौधरी यांना जाब विचारला.

दिलीप चौधरी यांनी आपण एक पैसा देखील न घेता भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याचे सांगितले. तथापि, इतरांचा यावर विश्वास बसला नाही. परीणामी शाब्दीक चकमकीसह हमरातुमरी आणि अखेर धक्काबुक्की पर्यंत वाद वाढला तेव्हा या प्रसंगी उपस्थित लिलाधर नारायण चौधरी, गणेश नेहेते, भीमराव भालेराव, नितीन वासुदेव चौधरी, लीलाधर विश्वनाथ चौधरी, संजय ढाके, नितीन लहू चौधरी, भास्कर पिंपळे, नारायण चौधरी दूध संघाचे संचालक यांनी दुध उत्पादकांची समज काढली

सदरील घटनेचा गावातील काही जणांची थेट सोशल नेटवर्कवर लाईव्ह व्हिडीओ प्रसारीत केला व दुध उत्पादक सह संचालकांच्या अशा आर्थिक देवाण-घेवाणीवरून उफाळलेला वाद जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे.