परप्रांतीयासोबत वाद, तरुणाच्या जीवावर बेतला

धरणगाव : परप्रांतीयासोबत झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ३० वर्षीय तरुणाचा काही बिहारी मजुरांसोबत किरकोळ विषयांतून वाद झाला. या वादात त्याची हत्या झाली आहे. कालू सोनवणे (वय ३० रा, दहिवद तांडा, शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल १७ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

धरणगाव शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर काम करतात. काल रात्री ९ वाजेच्या सुमारास कालू सोनवणेचा जिनिंगमधील काही बिहारी मजुरांसोबत किरकोळ विषयातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. साधारण १५ ते १७ जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून फरार झाले. कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

१७ संशयित ताब्यात
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सह,पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पी.एस.आय अमोल गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील या पथकाने अनोरे, धानोरे,गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. पहाटेपर्यंत पोलिसांनी तब्बल १७ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.