जळगाव : राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजूरांना तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना-कारागिरांना तसेच घरेलू काम करणाऱ्या महिलांना शासनातर्फे व कामगार कल्याण मंडळातर्फे वेगवेगळे साहित्य व घरगुती भांडीकुंडी वाटण्यात येत आहेत. परंतु , यात मक्तेदार हा भ्रष्टाचार करुन शासनाच्या तिजोरीवर डाका टाकत असून त्याची चौकशी करण्यात यावी , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गटातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, बांधकाम कामगार व घरेलू कामगार यांना देण्यात येणाऱ्या साहीत्याचा व घरगुती भांड्यांचा दर्जा अत्यंत खालच्या दर्जाचा आहे. यांची साधारण बाजारभाव किंमती ३ ते ४ हजार रू. च्या दरम्यान असून होलसेल बाजारभाव व मोठ्या प्रमाणात घेतल्यास अडीच ते साडेतीन हजार रूपयांपर्यंत मक्तेदारास मिळू शकते. परंतु, मक्तेदार शासनाकडून या एका किटची किंमत (साहित्य किंवा भांडीकुंडी) शासनास २५ ते ३० हजार रू. लावत असून गोरगरीब कष्टाळू कामगार मजूर व महिला यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शासनाच्या तिजोरीवर डाका टाकत आहे. ही जनतेच्या पैशांची लूट असून शासनाने या भ्रष्टाचारास आळा घालावा व ‘मक्तेदाराची चौकशी करावी.
पुरवठादार हा सर्व महाराष्ट्राला या साहित्याचा व भांडीकुंडी पुरवण्याचे काम करीत आहे. शासनाला वेळोवेळी पोषण आहार-कामगारांना जेवण तसेच कारागृहातील कैद्यांना भोजन वाटपाच्या नावावर मोठ्या प्रमाणात लुट करणारेच मक्तेदार यात सामील आहेत. वेळोवेळी याबाबत या मक्तेदाराच्या तक्रारी केलेल्या आहेत. परंतु, यात लोकप्रतिनिधी-मंत्री-अधिकारी यांची भागीदारी व वाटा ठरला असल्याने त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही.
तरी या योजनेत पूर्ण महाराष्ट्राला साहित्य व भांडीकुंडी पुरवणाऱ्या मक्तेदाराच्या साहित्याच्या दर्जाची तपासणी करावी व शासनाची होणारी लुट थांबवावी अशी मागणी या निवेदनामार्फत माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, डॉ. रिझवान खाटीक, किरण राजपुत, सुहास चौधरी, रिकु चौधरी, हितेष जावळे आदींनी केली आहे.