जळगाव : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४२ हजार ३८३ क्विंटल बियाण्याची गरज आहे. याबाबचा प्रस्ताव जि.प.च्या कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे. यात सर्वाधिक मका, कापूस व सोयाबीन बियाण्याची मागणी प्रस्तावित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांनी सांगितले.
जिल्ह्यात सर्वाधिक ५ लाख ५२ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. त्यानंतर ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी करण्यात येणार आहे. मात्र यंदा गतवर्षाच्या तुलनेत कपाशी लागवडीचे क्षेत्र घटणार आहे. कारण मागील वर्षांचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच भाव नसल्याने विक्रीअभावी पडून आहे. तसेच जिल्ह्यात १९ हजार २०० हेक्टरवर संकरीत ज्वारी, १४ हजार ५०० हेक्टरवर मूंग व १४ हजार हेक्टरवर उडीद पेरणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ११ हजार ५६० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाजरी १० हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी पिकाची पेरणी होणार आहे. तसेच ३ हजार ३०० हेक्टरवर मागील वर्षी पाऊस वेळेवर न आल्याने जिल्हाभरातील बहुतांश ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली होती. विशेषतः चाळीसगाव तालुक्यात दोनदा पेरणी करूनही पिके वाया गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले होते.
जिल्ह्यात कपाशीचे घटणार ५ हजार हेक्टर क्षेत्र
जिल्ह्यात सन २०२१-२२-२३ या तीन वर्षांत सरासरी कपाशीचे क्षेत्र ५ लाख ५३ हजार ५५० हेक्टर होते. यंदा मात्र यात पाच हजार हेक्टरची घट होणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कपाशीचे उत्पादन घटणार आहे. मात्र मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.