नागपूरच्या जरीपटका परिसरातील मार्टीन नगर येथे एका दाम्पत्याने लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेरील उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप (वय ५०) आणि एनी जेरील मॉनक्रीप (वय ४८) असे या दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे.
अपत्य न होणे आणि आर्थिक तणावामुळे नैराश्य
जेरील आणि एनी यांचा विवाह २५ वर्षांपूर्वी झाला होता, परंतु अपत्यप्राप्तीसाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना मूल होऊ शकले नाही. या गोष्टीमुळे दोघेही नैराश्याच्या गर्तेत होते. शिवाय, जेरील यांना रोजगार नसल्यामुळे घरची आर्थिक परिस्थितीही हलाखीची झाली होती. यामुळे दोघांनीही टोकाचं पाऊल उचललं असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
लग्नाचा वाढदिवस साजरा करत शेवटचा निरोप
सोमवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. दिवसभर दोघांनीही लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला. नातेवाईक आणि मित्रांकडून आलेल्या शुभेच्छांना उत्तरंही दिली. परंतु रात्री त्यांनी लग्नातले पारंपरिक कपडे घालून गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ शूट केला, ज्यामध्ये त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं.
“प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, सगळे आनंदात रहा”
शेवटच्या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं की, “प्रत्येक कुटुंब आणि त्यांची परिस्थिती वेगळी असते. आम्हीही वेगळे आहोत. सगळे आनंदात रहा. मुलांची काळजी घ्या.” हा व्हिडीओ त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता, ज्यामुळे ही घटना उघडकीस आली.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.