Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू,,गावकऱ्यांत दहशत

चिमूर – जंगलात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या ७० वर्षीय गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवार (ता. २५) दुपारी पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव नियत क्षेत्रात घडली.

विहीरगाव परिसरात वाघाचा वावर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या विहीरगाव येथे गेल्या आठवडाभरापासून वाघाचा वावर आहे. त्यामुळे गुराखी एकमेकांच्या सोबतीने जंगलात जनावरे चराईसाठी नेत आहे. दुसऱ्या गुराख्यांसोबत जनावरे घेऊन गेलेले दयाराम गोंडाणे हे जंगलात  जात असताना वाघाने त्यांच्यावर दबा धरून हल्ला केला. सहकारी गुराख्यांच्या आरडा-ओरड सुरू केली. तरीही वाघाने त्यांना सोडले नाही. 

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले काही अंतरावर दयाराम गोंडाणे यांचा मृतदेह आढळला. घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

 वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
परिसरात वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबाला तातडीने पन्नास हजार रुपये आर्थिक मदत दिली आहे.