जळगाव : डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवार, २४ रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात घडली. माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (53, रा.महात्मा फुले नगर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने शहरासह तालुक्यात मोठी खळब उडाली आहे. दरम्यान, जोनवाल यांनी 24 वर्षांपूर्वी एकाचा खून केला होता. त्या प्रकरणात मयताच्या मुलानेच वडिलांच्या खुनाचा बदला घेतल्याचे समोर आले आहे.
भुसावळ शहरातील गवळीवाडा भागातील दस्तगीर गफूर खाटीक यांची 1999 मध्ये दिलीप जोनवालसह अन्य संशयीतांनी हत्या केली होती. खून प्रकरणात जोनवाल यांच्यावर कारवाईदेखील झाली होती मात्र वडिलांची हत्या करणाऱ्यास कायमचा धडा शिकवण्यासाठी मयत दस्तगीर खाटीक यांचा मुलगा आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) व मयताचा पुतण्या साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) हे आगीत जळत होते. मंगळवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल हे अकलूद येथून जेवण करून गरूड प्लॉट भागात येत असताना संशयितांनी त्यांचा रस्ता अडवत त्यांना सुरूवातीला बेदम मारहाण केली तसेच लोखंडी पाईपाने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होवून जोनवाल यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रतिहल्ल्यात संशयित अदिल खाटीक जखमी झाला असून साजीदला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
भुसावळ शहर पोलिसांची धाव
गरूड प्लॉट भागात अज्ञाताची हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याची माहिती कळताच भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. काही वेळेतच जोनवाल यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.
खुनातील संशयित आरोपीला अटक
दिलीप जोनवाल यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा संग्राम दिलीप जोनवाल (23, महात्मा फुले नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) व साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 1999 मध्ये दस्तगीर गफूर खाटीक यांचा वडिल दिलीप जोनवाल यांनी खून केल्याने त्या रागातूनच संशयित अदिल व साजीद यांनी डोक्यात लोखंडी पाईप मारून ही हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत. साजीद खाटीक यास अटक करण्यात आली आहे.