भुसावळ/शिरपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. अशातच पोलीस प्रशासनाने एका वाहनातून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका वाहनातून तब्बल ७० लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच ही रोकड पकडण्यात आली असून ती निवडणूक विभागाकडे जमा करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने अत्यंत काटेकोरपणे आदेशाचे पालन करीत पोलीस दलाकडून कारवाया सुरू आहेत. त्यातच शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना एका वाहनातून रोकड नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नाकाबंदी लावण्याच्या सूचना दिल्या. सेंधवाकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारे इनोव्हा वाहन (एम.पी.०९ डी.एल.८६१८) हे सोमवारी सायंकाळी थांबवल्यानंतर वाहनातील चालकासह तिघांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव संदीप चंद्रकांत पवार (३३, मोगलाई पॉवर हाऊससमोर, धुळे), तुषार शालिग्राम साळुंखे (३२, मोगलाई पॉवर हाऊससमोर, धुळे) व विजय चंद्रकांत कुलकर्णी (३७, गोकुळ धाम पार्क, शहादा) असे सांगितल्यानंतर वाहनाची तपासणी केली असता मागच्या बाजूला एका प्लास्टिकच्या गोणीत ७० लाखांची रोकड आढळली. ट्रेझरीत पाठवली रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी शिरपूर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना ही माहिती कळविण्यात आली. तद्नंतर एफएसडी पथकाला बोलविण्यात आले. त्यानंतर पंचनामा करून ७० लाखांची रोकड ट्रेझरीत पाठविण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार संतोष पाटील, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार शेखर बागुल, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.