धुळे : साक्री तालुक्यातील नवडणे शेतीशिवारात एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत, ६७ लाख २० हजार रुपये किमतीचे दारूचे ७०० खोके जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेअसून तर जागेचा मालक हा फरार झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून दारू तस्करी करणारे तसेच इतर अवैध तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सत्र आरंभले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना साक्री तालुक्यातील नवडणे परिसरात एका खोलीत विना परवानगी दारुचा मोठा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार उपनिरीक्षक अमरजीत मोरे , हवालदार संदेसिंग चव्हाण , हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ , योगेश चव्हाण आदींचे पथक कारवाई केली. या पथकाने संशयीताच्या घरावर छापा टाकला असता घरातून रॉयल ब्ल्यू कंपनीच्या दारूचे एकूण सातशे खोके आढळून आले
या घराजवळून दारूच्या साठ्याची रखवाली करणाऱ्या हरेकृष्णा मोतीराय ,रा. नागाटोला, बिहार याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीमध्ये दारू साठा ठेवलेल्या जागेचा मालक संदीप उर्फ मुन्ना शरद ठाकरे असल्याची बाब पुढे आली आहे. जागा मालक संदीप ठाकरे हा फरार झाला आहे .पोलीस पथकाने ६७ लाख वीस हजार रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.