Chandrapur News: राज्यातील बदलापूर प्रकरण ताजे असताना चंद्रपूर येथून एक धक्कादायक तसेच हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. चंद्रपुरातील एक प्रतिष्ठीत शाळेत गुरु-शिष्य नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला असून या ठिकाणी एका 11 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने तक्रार दिल्यावर नराधम शिक्षकावर कोरपना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 11 वर्षीय विद्यार्थिनी ही शाळेत क्लासेस करता आली होती. दरम्यान, शाळेतील शिक्षक अमोल लोंढे याने मुलीला ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. दरम्यान, ऑफिसमध्ये कुणी नसल्याची संधी साधत या नराधम शिक्षकाने अल्पवयिन विद्यार्थिनीला धमकावत तिला दोन गोळ्या खाण्यासाठी दिल्या आणि त्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना देखील जीवे ठार करेल अशी धमकी या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली.
दरम्यान, या प्रकारामुळे पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीला असहाय्य त्रास सुरु झाल्याने तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली असता विद्यार्थिनीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठत अमोल लोंढे याच्या विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पीडित मुलीचा जबाबावरुव नराधम अमोल लोंढे याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमोल लोंढे हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
आरोपी शिक्षक राजकीय पक्षाचा पदाधीकारी
अमोल लोंढे हा शिक्षक असण्यासोबत एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी देखील आहे. अमोल लोंढे हा राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोरपना येथील युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष आहे. अमोल लोंढे हा उन्हाळ्यात शाळेत अतिरिक्त वर्ग घेत होता. आणि तो यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोतावत होता. दरम्यान, संधी साधत त्याने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली असून शिक्षकाच्या कृत्याचा निषेध केला जात आहे.