जळगाव : चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला एलसीबीच्या पथकाने चोपडा शिरपूर मार्गावर गलंगी गावाजवळ ताब्यात घेतले. सुलतान खालीद पिंजारी (रा. इस्लामपुरा, दोंडाईचा) असे संशयिताचे नाव आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेवून ताब्यात घेण्याचे आदेश एलसीबीला प्राप्त झाले होते. त्यानुसार एलसीबीचे पथक चोपडा शहरात पेट्रोलिंग करीत होते. सुलतान पिंजारी हा दोंडाईचाहून शिरपूरकडे येत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यानुसार कारवाई करण्याचे टीमला सुचित केले.
चोपडा येथुन पथक खाजगी वाहनाने शिरपूर रोडवरील गलंगीगावाजवळ स्वतःची ओळख लपवून थांबले. एका दुचाकीने दोन इसम येत असताना पथकाने मागे बसलेल्या सुलतान याला ओळखले तत्काळ पथकाने दुचाकी थांबवित त्याला ताब्यात घेतले. संशयिताने त्याचे नाव सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर (वय २७, रा. इस्लामपुरा जामा मशिदजवळ दोंडाईचा) असे सांगितले. पथकाने त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ५७०० रुपये रोख जप्त केले. तसेच त्याला चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
पोलीस अधीक्षक महेश्वर चाळीसगाव अप्पर पोलीस रेड्डी, अधीक्षक कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि गणेश वाघमारे, अनिल जाधव, पोह विलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे यांनी केली.