Crime News : नंदुरबारमधील घरफोडी प्रकरणातील सराईत गुन्हेगार जळगावातून ताब्यात


Crime News : शहरातील टोयोटा शोरूम, बुलेट शोरूम आणि उज्ज्वल ऑटोमोबाइल्समध्ये झालेल्या घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील टोयोटा शोरूमचे व्यवस्थापक प्रदीप नामदेव राणे यांनी २५ जुलै रोजी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

२४ ते २५ जुलैदरम्यान चोरट्यांनी शोरूमच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रोख रक्कम किंवा मौल्यवान ऐवज नसल्याने त्यांना काहीही मिळाले नाही. त्यांनी फक्त किरकोळ तोडफोड केली होती. त्याचप्रकारे शहरातील धुळे रोडवरील दिनेश व्हिल्स बुलेट शोरूम आणि उज्ज्वल ऑटोमोबाइल्स येथेही अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिस संयुक्तपणे करत होते. १ ऑगस्टला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हा गुन्हा जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील धानोरी येथील सराईत गुन्हेगार युवराज देवराम मोहिते (वय ३५) याने त्याच्या साथीदारांसोबत केला असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पथके तयार करून जळगावमधील बोदवड येथे छापा टाकला. पोलिसांनी धानोरी गावातून युवराज मोहिते याला त्याच्या घराजवळून शिताफीने ताब्यात घेतले. नंदुरबार शहर पोलिसांनी त्याला अटक केली असून, तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलिस अंमलदार अभय राजपूत, भरत उगले, पंकज महाले, हरेश कोळी आणि ललित गवळी यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---