जळगाव : चार वर्षांपूर्वी जिल्हा उप कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत बंदी चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तात्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यासह ५ आरोपींनी मारहाण करून खून केल्याचे निष्पन्न आले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी तत्कालिन अधीक्षक पेट्रस गायकवाड याचा मंगळवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
चिन्या उर्फ रविंद्र जगताप हा एका गुन्ह्यात जळगाव उप कारागृहात असतांना तात्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यासह तुरूंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद् पाटील आणि दत्ता खोत यांनी चिन्या जगताप याला बेदम मारहाण केली होती. यात चिन्या जगताप याचा मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणामध्ये चिन्या जगताप यांची पत्नी मिनाबाई रविंद्र जगताप यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागत आहे. या गुन्ह्यात फरार असलेला तात्कालीन कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड हा फरार झाला होता. यानुसार २९ जुलै २०२४ रोजी गायकवाड हा जिल्हापेठ पोलीसांना शरण आला होता. दरम्यान, त्यानंतर २० ऑगस्ट रोजी गायकवाड याने जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता न्यायमुर्ती एस.आर. पवार यांनी फेटाळून लावला आहे.