जळगाव : बंद घरातून सुमारे ८ लाख ४७ हजाराचा मुद्देमाल घेतला. त्यानंतर चोरलेल्या दुचाकीने पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करुन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. १७ रोजी ही घटना महावीरनगरात घडली. सोमा अलावा (५०, रा. नरवाली ता. कुक्षी म.प्र.) असे संशयिताचे नाव आहे.
ईश्वर गुणवंतराव खंदार हे महावीर नगरात वास्तव्यास आहेत. रक्षाबंधनानिमित्त शुक्रवारी घराला कुलूप लावून खंदार परिवार बडोदा येथे त्यांच्या बहिणीकडे गेले. हे बंद घर हेरत चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत प्रवेश केला. लोखंडी कपाटातीला सामान अस्तव्यस्त करत चोरट्यांनी सोनेचांदीचे दागिने, रोकड असा सुमारे ८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. पसार होण्यासाठी चोरट्यांनी खंदार यांच्या भावाची दुचाकी चोरुन पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करत संशयित सोमा अलवा याला ताब्यात घेतले. मात्र त्याचे तीन साथीदार रवी अलावा (२२), राकेश अलावा (३२) तसेच भारत अलावा (२२) हे पसार झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सोमा अलावा याला १८ रोजी न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या चौकडीने अन्य शहरातही धाडसी चोरी केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तिघा चोरट्यांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.