शिरपूर : पतीच्या व्यासनाधीनतेला पत्नी कंटाळली होती. पतीच्या व्यासनधिनतेवरून घरात सतत वाद होत होते. अशाच वादात पत्नीने पतीला मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाला. खून केल्याच्या संशयावरून थाळनेर पोलिसांत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे हि खुनाची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत श्रावण काशीनाथ धनगर (वय ४३) याचा मृत्यू झाला दरम्यान, मंगळवार १६ जुलैला दुपारी श्रावण धनगर हा बेशुद्ध झालेला आढळला. ही बाब कळताच परिसरातील लोकांची गर्दी केली. तर श्रावणचा भाऊ गोकुळ धनगर याने पाहिले असता त्याच्या डोक्याच्या मागील भागात इजा होऊन रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर श्रावणची पत्नी संगीता धनगर हिने तो खाटेवरून पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. परंतु, तिच्या बोलण्यावरून संशय बळावल्याने गोकुळ धनगर याने त्यांच्या शेजारी चौकशी केली. यात श्रावण व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली. श्रावणला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. श्रावणच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत श्रावणचा मृत्यू झाल्याचा संशय गोकुळ धनगर असल्याने या विरोधात पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून संगीता धनगर हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.