मावसबहिणीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीचे घरासमोर राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम जुळले. मुलगी अल्पवयीन असतांना देखील दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर पीडीता गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडीतेने दिलेल्या जबाबावरुन तिच्या पती व सासरच्या मंडळींसह मावस बहिणीविरुद्ध बालविवाह केल्यासह पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील सीटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडील व भावासह वास्तव्यास आहे. त्या मुलीची मावस बहिण ही जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. त्यामुळे पीडीता ही मावस बहिणीकडे येत होती. त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणासोबत मुलीची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर ही बाब दोघांच्या कुटुंबियांना समजली. त्यांनी दि. 4 एप्रिल 2024 रोजी दोघांचा विवाह लावून दिला.
दोघ प्रेमीयुगुलाचा विवाह झाल्यानंतर पीडीता ही गर्भवती राहीली. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत पीडीतेने पोलिसात जबाब दिला असून त्यानुसार पीडीतेचा पती, सासू, सासरे व तिची मावस बहिण व तिचा नवरा यांच्याविरुद्ध बालविवाह करण्यासह पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अनिल वाघ करीत आहे.