प्रथमच राष्ट्रपती भवनात होणार शुभमंगल, मदर टेरेसा क्राऊन परिसरात दुमदुमणार सनईचे सूर

#image_title

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात् सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट पदावर तैनात असणाऱ्या मध्यप्रदेशातील शिवपुरीच्या कन्या पूनम गुप्ता यांच्या विवाहाच्या सनईचे सूर थेट दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात घुमणार आहेत. त्यांचा विवाह राष्ट्रपती भवन परिसरात होणार असून, पहिल्यांदाच या ठिकाणी एखादा लग्नसमारंभ होण्याचा योग जुळून आला आहे.

पूनम गुप्ता मागील काही कालावधीपासून राष्ट्रपती भवनात वैयक्तिक सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत आहेत. जम्मू-काश्मिरात सेवा देत असलेले असिस्टंट कमांडंट अविनाश कुमार यांच्यासोबत पूनम यांची लगीनगाठ बांधली जाणार आहे. हा विवाह समारंभ १२ फेब्रुवारी रोजी होईल. पूनम यांचे पिता शिवपुरीतील श्रीराम कॉलनीत वास्तव्यास आहेत. नवोदय विद्यालय मगरौनी येथे कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. यांचा सौम्य व्यवहार आणि मृदू स्वभाव तसेच कर्तव्यनिष्ठा या गुणांमुळे राष्ट्रपती मुर्मू अतिशय प्रभावित आहेत.

Nari Shakti Half page

जेव्हा त्यांना पूनम यांचे लग्न ठरल्याचे समजले, तेव्हा त्यांनी हा सोहळा राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राऊन परिसरात करण्याचे ठरविले. पूनम गुप्ता यांनी मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी झालेल्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यांनी पदवीचे शिक्षण घेत इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे.

त्या जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी होत्या. त्यांनी २०१८ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत ८१ वी रॅक मिळवून सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट हे पद मिळविले. दरम्यान, पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात अशा प्रकारचा लग्नसोहळा होणार असल्याने या विवाहासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे. काही मोजकेच निमंत्रित या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यात नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्यातील मोजक्या लोकांना राष्ट्रपती भवनात उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.