जम्मू-काश्मीरमध्ये 1800 अतिरिक्त ‘CRPF’चे जवान होणार तैनात

जम्मू : जम्मूतील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील वाढते दहशतवादी हल्ले आणि नागरिकांच्या वाढत्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेलता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये CRPF च्या अतिरिक्त १८ कंपन्या म्हणजेच १८०० जवान तैनात करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या दोन दहशतवादी घटनांमध्ये दोन अल्पवयीन चुलत भावांसह सहा जण ठार झाले होते. तसेच सोमवारी आयईडीच्या स्फोटात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी रविवारी संध्याकाळी राजौरी परिसरात दहशतवाद्यांनी तीन घरांवर गोळीबार केला, ज्यात चार नागरिक ठार झाले होते, तर सहा जखमी झाले होते.

राजौरी आणि परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच हल्ल्यामागे सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या हल्ल्यांनंतर माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रसरकारवर हल्लाबोल केला आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. जम्मूच्या लोकांनी भाजपला मतदान केले, पण आता त्यांच्यावर हल्ले होत आहेत, मात्र, नागरिकांच्या सुरक्षेऐवजी भाजप केवळ तमाशा पाहत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला आहे.