Gold-Silver Rate Today : सोनं-चांदीत पुन्हा दरवाढ; जळगावच्या ग्राहकांना घाम फोडणारा झटका

जळगाव ।  नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने-चांदीने जोरदार फटकेबाजी केली असून, जळगाव सराफा बाजारात दरवाढीने ग्राहकांना घाम फोडला आहे. ऐन लग्नसराईत या दरवाढीमुळे वधू-वर मंडळींना जादा रक्कम मोजावी लागत आहे. या आठवड्यात सोनं आणि चांदीने दरवाढीचा उच्चांक गाठत ग्राहकांवर आर्थिक भार टाकला आहे.

सोन्याचे दर गगनाला भिडले

या आठवड्यात सोन्याने एकूण 1730 रुपयांची दरवाढ केली आहे. सोमवारी 420 रुपयांनी महाग झालेलं सोनं, 14 जानेवारी रोजी 110 रुपयांनी स्वस्त झालं, परंतु त्यानंतर 15, 16, आणि 17 जानेवारीला अनुक्रमे 110, 550 आणि 650 रुपयांनी दरवाढ झाली. यामुळे 22 कॅरेट सोनं 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोनं 81,420 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचलं आहे.

चांदीची चमकही वाढली

चांदीनेही ग्राहकांना जोरदार झळ दिली आहे. सोमवारी चांदीने 1000 रुपयांनी वाढ केली, परंतु 14 जानेवारी रोजी 2000 रुपयांनी घट झाली. त्यानंतर 15 आणि 16 जानेवारीला अनुक्रमे 1000 आणि 2000 रुपयांनी वाढ झाली. 17 जानेवारीला आणखी 1000 रुपयांनी दरवाढ झाली. सध्या एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपयांवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन्स असोसिएशनचे अपडेट

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये पुढील बदल दिसून आले.

24 कॅरेट सोनं: 79,239 रुपये
23 कॅरेट सोनं: 78,922 रुपये
22 कॅरेट सोनं: 72,583 रुपये
18 कॅरेट सोनं: 59,429 रुपये
14 कॅरेट सोनं: 46,355 रुपये
एक किलो चांदी: 90,820 रुपये

सोने-चांदीचे भाव कसे तपासाल?

ग्राहकांना सोने-चांदीचे ताजे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याची सुविधा उपलब्ध आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून दररोज (शासकीय सुट्या वगळता) दर जाहीर केले जातात. स्थानिक कर आणि इतर शुल्कामुळे शहरानुसार किंमतीत फरक दिसतो.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि वायदे बाजारात सोने-चांदीवर कर आणि शुल्क लागू होत नसल्याने तेथील दर तुलनेने कमी असतात. मात्र, स्थानिक बाजारात कर आणि अन्य शुल्कामुळे दर वाढल्याचे जाणकार सांगतात.

सध्या सराफ बाजारात दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा तडाखा बसत असून, लग्नसराईत या वाढलेल्या दरांचे परिणाम दिसून येत आहेत.