सायबर ठगांवर पोलिसांचा कठोर कारवाईचा प्रभाव: तक्रारदाराला परत मिळाले लाखो रुपये

#image_title

जळगाव : मनी लाँडरिंग प्रकरणी तुमच्यावर मुंबई क्राईम ब्रँचला गुन्हा दाखल झाला, असे भासवून तक्रारदाराला सायबर ठगांनी डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर ऑनलाइन १८ लाखांचा गंडा घातला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांच्या निर्णायक तपासातून १७ लाख रुपयांची रोकड तक्रारदाराला देण्यात यश मिळविले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवार, २७ रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तीन महिन्यात सायबर फसवणूक गुन्ह्यात एक कोटी १९ लाख ४२ हजार ९३२ रुपयांची तक्रारदारांची रक्कम वाचविण्यातही पोलिसांना यश आले आहे. नागरीकांनी आपली वैयक्तीक माहीती कोणालाही देवू नये तसेच अनोळखी व्हिडीओ कॉल ला प्रतिसाद देवू नये. मुळात डिजीटल अरेस्ट हा प्रकारच नाही असेही पोलीस अधिक्षक डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.

राजेंद्र गुलाबराव गरुड यांना १९ नोव्हेंबर २०२४ ते २५ नोव्हेंबर दरम्यान राहुल गुप्ता तसेच त्याचा असिस्टंट संदीप राव या ठगांनी त्यांच्या व्हॉट्सअप मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस अधिकारी भासवित या ठगांनी गरुड यांना धमकावित सांगितले, मनी लाँडरिंगमध्ये तुमचे सीमकार्ड, पॅनकार्ड व आधारकार्डचा वापर झाला आहे. त्यामुळे तुमच्यावर मुंबई क्राईम बॅचला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे फसवणुकीचे नाट्य खरे असल्याचे भासविले. त्यानंतर तक्रारदार यांना ठगांनी डिजिटल अरेस्ट करत ताब्यात घेतले. त्यांना वारंवार धमकी दिली. त्यानंतर ऑनलाइन न्यायालयासमोर हजर करत त्यांना कायद्याची भीती दाखविली. न्यायालयाची खोटी ऑर्डर व खोटी कागदपत्रे व्हॉट्सअपवर पाठविली. त्यानंतर त्यांच्याकडून १८ लाखांची रक्कम ऑनलाइन स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी ७ डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तक्रारदाराने कोणत्या बँकेच्या खात्यात पैसे भरले. या तपासाला सायबर पोलिसांनी गती दिली असता इंडसइंड बँक खात्यात पैसे भरल्याची माहिती समोर आली. हे खाते जालंदर पंजाब येथील असत्याचे तपासातून निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी हे खाते तत्काळ गोठविले. त्यानंतर न्यायालयाच्या मार्फत खात्यातील सुमारे १७ लाखांची रक्कम तक्रारदार यांच्या स्वाधीन
करण्यात आली.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे, पोलीस हवालदार हेमंत महाडीक, पोलीस नाईक सचिन सोनवणे यांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या टीमचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज कौतुक केले. या वेळी तक्रारदार राजेंद्र गरुड यांनी पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्यासह पोलिसांना पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले.

एक कोटीच्या फसवणुकीत वाचविले ५२ लाख

संतकुमार कृपाराम उईके यांना १६ जुलै २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ पावेतो अंकित अग्रवाल, मीरा यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क केला. शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना अलंकीत नावाचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला भरलेल्या रकमेवर ३५०० रु. नफा झाल्याचे सांगून त्यांच्याकडून एकूण एक कोटी सहा लाख पाच हजार ९८५ रुपये ऑनलाइन नेटबँकिंगद्वारे घेत ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सायबर पोलिसांनी तपासातून ही रक्कम युको बँक गुजरात व आंध्र प्रदेश येथील बँक खाते गोठवून ५२ लाख ४७ हजार रुपये न्यायालयामार्फत आदेशित करून तक्रारदाराच्या बँक खात्यात वर्ग करून परत मिळवून दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.