तरुण भारत लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । एख्याद्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची बातमी आपण सोशल मीडियावर वाचलीच असेल, परंतु, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात संतापजनक घटना घडली आहे. पाळीव कुत्र्यावर चक्क पुतण्याने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बाबासाहेब लक्ष्मण ढोबळे रा.मापारवाडी रोड, लोणी खुर्द यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी म्हटले आहे की, मी सदर ठिकाणी शेतात घर बांधून रहात असून माझ्याकडे पाळीव कुत्रा आहे. आम्ही दोघे पती-पत्नी टाकळीभान येथे नातेवाईकांच्या वर्षश्राद्धासाठी त्याला साखळीने बांधून गेलो होतो.
परंतु माझा पुतण्या दीपक दत्तात्रय ढोबळे याचा मला फोन आला. त्याने तुझ्या कुत्र्याचे काम केले असून मी कोयता घासून ठेवला आहे तू घरी ये, तुझेही काम करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या कुत्र्याच्या तोंडावर,पाठीवर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून मी खाजगी डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले आहेत.
पोलिसांनी दीपक ढोबळे विरुद्ध भादवी कलम ४२८,४२९,५०७ व पाळीव प्राणी छळ प्रतिबंध कायद्याच्या कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला. लोणी पोलीस ठाण्यात कुत्र्यावर हल्ला झाल्यानंतर तक्रार झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.