बाप रे! रेल्वेने गांजाची तस्करी, सतर्क रेल्वे सुरक्षा बलानं..

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ ।  अप कर्नाटक एक्स्प्रेसमधून जळगाव-मनमाड दरम्यान गांजाची तस्करी करणार्‍या मालेगावातील प्रौढास सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने पकडत त्याच्याकडील सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला.

समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी (६२, घर नं.८९, सर्वे नं.५५, शफीनगर, मालेगाव, जि.नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीत हे १२६२८ अप कर्नाटक एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- ३ मधून शुक्रवारी जळगाव ते मनमाड विनातिकीट प्रवास करीत असताना गाडीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्तीपथकातील आरक्षक नागेश धनवटे व आरक्षक मनोज कुमार यांना जळगाव-शिरसोलीदरम्यान संशय आल्याने त्यांनी पिंजारी यांना बॅगेत काय आहे? अशी विचारणा केली असताना प्रवाशाने त्यात पाला-पाचोळा असल्याचे उत्तर दिल्याने पथकाला संशय आला व त्यांनी बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात सम्राट डिलक्स मिरची पावडर लिहिलेली थैली आढळली व या थैलीआत प्लॅस्टीक पिशवीत गुंडाळलेला सुमारे १२ किलो ३९ गॅ्रम वजनाचा गांजा आढळल्याने तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरपीएफ उपनिरीक्षक समाधान वाहूळकर यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्ह्याचे कार्यक्षेत्र जळगाव असल्याने हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. तपास निरीक्षक विजय घेर्डे करीत आहेत.