प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला अनेक अनमोल देणग्या दिल्या आहेत. त्यात योगविद्येचाही समावेश होतो. सध्या अवघे जग योगप्रेमी बनले आहे. योगासनांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक लाभ होतात, हे आता संशोधनांती सिद्ध झाले आहे. नव्या संशोधनानुसार, दररोज नियमित २० मिनिटांच्या योगासनांनी मेंदूचे कार्य झपाट्याने सुधारते, हे स्पष्ट झाले आहे.
दररोज २० मिनिटे योगासने केल्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते, असा दावा एका भारतीय संशोधकाने केला आहे. प्रामुख्याने हठयोगात मेंदूचे कार्य सुधारण्याची ताकद आहे. यात मेंदूचे शरीरावरील नियंत्रणही चांगले राहते. एकाग्रता वाढणे आणि माहिती ग्रहण करण्याची क्षमता वाढून नवीन माहितीचा योग्य प्रकारे वापर करण्यास उत्तेजन मिळते, असाही दावा करण्यात आला आहे.
इलिनॉईस विद्यापीठातील नेहा गोथे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांवर याविषयीचा प्रयोग केला. त्यात एका गटाला एरोबिक व्यायाम देण्यात आला, तर दुसऱ्या गटाला योगासनांचा सराव करण्यास सांगण्यात आले. यावेळी नमुना निवडीत तरुण, तरुणी व पदवीधर नसलेली मुलेही होती. गोथे यांच्या मते, योग हे प्राचीन विज्ञान आहे व तो जगण्याचा एक मार्ग आहे. शारीरिक हालचालींची लयबद्धता त्यातून कळते व श्वासावर नियंत्रण तसेच ध्यानधारणा यामुळे मन शांत होते. यात तुमची ध्यानक्रिया सुधारते. २० मिनिटे योगासने केल्याने तुमच्या शरीराची बसण्याची स्थिती सुधारते. स्नायू मोकळे होतात, खोल श्वसन आणि ध्यानधारणेचे बरेच फायदे होतात. या प्रयोगात सहभागी असलेल्यांत जे एरोबिक व्यायाम करीत होते, ते रोज ट्रेडमीलवर २० मिनिटे जॉगिंग आणि चालण्याचा व्यायाम करीत होते. प्रत्येकाचा ट्रेडमीलवरचा योग ठरावीक होता व हृदयाचे ठोके ६० ते ७० टक्के अधिक होते. या परिस्थितीत आकलनशक्ती सुधारते आणि इतर चांगले परिणाम घडतात. त्यामुळे त्यांना या स्थितीत व्यायाम करण्यास सांगितले होते. गोथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले की, एरोबिक व्यायामापेक्षा योगासनांनी माणसाच्या प्रतिक्षिप्त क्रिया व आकलनशक्ती यात जास्त सुधारणा दिसून आली. स्मरणशक्ती सुधारली, शरीरावरील नियंत्रण सुधारले.