जळगाव : जिल्ह्यात अनेक भागांत बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा यासह फळबागांनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चोपडा तालुक्यात १९ गावांत झाले आहे. परिणामी या आस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
चोपडा तालुक्यात बुधवारी (ता. १५) झालेल्या अवकाळी पावसामुळे १९ गावांमधील ४८५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या मालास भाव नाही. त्यात पुन्हा तालुक्यात झालेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
तालुक्यातील १९ गावांमधील ५१३ शेतकऱ्यांच्या ४८५ एकर क्षेत्रावर नुकसान झालेले आहे. यात मका ११७ हेक्टर, गहू ९७ हेक्टर, ज्वारी १३९ हेक्टर, हरभरा १०७ हेक्टर, केळी २५ हेक्टर असे एकूण ४८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी कार्यालयाने दिली आहे.