नंदुरबार : वनपरिक्षेत्रात हरणांसारखे सुंदर वन्यजीवदेखील अस्तित्वात आहेत, याचा सुखद धक्का चार दिवसापूर्वी अनुभवणाऱ्या वन्यजीवप्रेमींना मिळाला. पण सिंदगव्हाण वनपरिक्षेत्रातून गरोदर हरीणीने २६ जून २०२४ रोजी अखेर पिंजऱ्यातच जीव सोडला. ही घटना वन्यजीवप्रेमींच्या मनाला चटका लावून गेली.
चार दिवसापूर्वी नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण वनपरिक्षेत्र हद्दीत हरिणी आढळली होती. स्थानिक ग्रामस्थांनी नंदुरबारचे वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण यांच्याशी संपर्क करून याची माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी काही सहकाऱ्यांची मदत घेऊन त्या हरणाला ताब्यात घेतले आणि नंदुरबार वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या आवारात त्याला एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले. भटक्या कुत्र्यांनी जखमी केले असल्यामुळे त्याला वनक्षेत्रात सोडता आले नाही आणि म्हणून त्याच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहे; असे त्या प्रसंगी सांगण्यात आले होते. त्यानुसार त्याची काळजी घेतली जात होती. तथापि, २६ जून रोजी त्या गरोदर हरणीने पिंजऱ्यातच जीव सोडला. नाजूक सुंदर दिसणारी ती मादा हरीण लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या नंदुरबार वनक्षेत्रपाल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तिचा जिव्हाळा लागला होता. या गरोदर हरणीचा मृत्यूने चटका बसला. वनविभागाच्या ताब्यात असताना हरणाचे योग्य संगोपन का झाले नाही ?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात काही वन्यजीवप्रेमींनी यावर संतप्त भावना व्यक्त केल्या. ते हरिण खरोखर जखमी होते का? याविषयी साशंकता वाटते, तसे असेल तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख आला पाहिजे, असे नमूद करून काही जणांनी सांगितले की, ती हरिणी गरोदर होती. तज्ज्ञ अनुभवी लोकांकडून तिचे रेस्क्यू न केल्यामुळे चुका घडल्या. तसेच लोकांपासून तिला दूर ठेवण्यात आले नाही म्हणून तिचा जीव गेला असावा, अशी शंका व्यक्त केली.
वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे जखमी अवस्थेतच ती सापडली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तिच्यावर उपचार केले जात होते. मात्र आज ती अचानक दगावली याचे दुःख वाटते.
उपवनसंरक्षक धनंजय पवार यांनी सांगितले की, ती हरणी रेस्क्यू केली गेली त्या प्रसंगीच जखमी होती. तिच्यावर उपचार चालू होते. परंतु, ती गरोदरदेखील होती. तिच्या पोटातील पिल्ल दोन दिवस आधीच पोटातच मरण पावले होते, ही बाब तिच्या मृत्यूनंतर आज उघड झाली आहे. कदाचित त्यामुळेच ती आज दगावली असावी.