---Advertisement---
नवी दिल्ली : लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत न्यायालयानं चार दिवसांची वाढ केली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदना यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं चारही आरोपींच्या एनआयए कोठडीची मुदत वाढवून दिली. या अगोदर 29 नोव्हेंबरला न्यायालयानं या आरोपींना सोमवारपर्यंत एनआयए कोठडी ठोठावली होती.
आरोपींमध्ये डॉ. मुझम्मिल गनी, डॉ. आदील राथर, डॉ. शाहिना सईद आणि मौलवी इरफान अहमद वागायचा समावेश आहे. २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या दहा दिवसांच्या एनआयए कोठडीची मुदत आज संपुष्टात आल्याने त्यांना प्रधान आणि सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदन यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
पटियाला हाऊस जिल्हा न्यायालय परिसरात आज कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती तसेच न्यायालयातून वार्तांकन करण्यास माध्यमांना बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. ते सर्व जम्मू-काश्मीर पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या व्हाईट कॉलर्ड मोड्युलचे सदस्य आहेत.









