दिल्ली : दिल्लीमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री ज्या पद्धतीने एका तरुणीचा मृत्यू झालाय, ते पाहून देश हादरुन गेला. या घटनेच्या पोलीस चौकशीत नवीन माहिती समोर येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण घटनेच्या रात्री एका हॉटेलात बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या स्कुटीवरून परतत होत्या. त्याचवेळी अपघात झाला.
पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरकडे चौकशी केली. त्यावेळी त्या रात्री दोन्ही तरुणींमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून बाचाबाची झाली होती, असं मॅनेजरनं सांगितलं. याबाबतचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
मात्र, त्या दोघींनी काहीही एक ऐकलं नाही. त्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडल्यावरही त्या दोघींमध्ये वाद सुरूच होता. दोघींमध्ये वाद सुरू असताना, आजूबाजूच्या काही लोकांनी मध्यस्थीही केली होती. त्यानंतर त्या दोघी स्कुटीवरून निघून गेल्या, असंही मॅनेजरनं सांगितलं.
मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, पीडित तरुणीनं पार्टीसाठी स्वतःच खोली बुक केली होती. पार्टीवेळी पाच ते सात मुलंही होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या रात्री हॉटेलात उपस्थित असलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. दोघांच्या चौकशीतून तरुणींमध्ये झालेल्या वादाची माहिती कळू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.