---Advertisement---
खरीप हंगामाला अजून साधारण दोन महिने शिल्लक असले तरी जिल्ह्यात कृषी विभागाच्या तयारीला वेग वेग आला आहे. येत्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन तयार करण्यात आले असून, सुमारे ७ लाख ३९ हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बीटी कापसासाठी सुमारे २२ लाख बियाणे पाकिटांची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मका आणि तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. त्यामुळे या पिकांच्या बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असली, तरी शेतकरी सुधारित व दर्जेदार बियाण्यांनाच प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. याच अनुषंगाने अपेक्षित लागवड क्षेत्र लक्षात घेऊन बियाण्यांच्या मागणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात आढावा बैठकही होणार आहे.
मागील काही वर्षांत कापसाखालील क्षेत्र घटले आहे आणि यंदाही त्यात फारशी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. तरीही खरीप हंगामात सुमारे ४ लाख ४२ हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यासाठी २१ लाख ८५ हजार ६६७ बीटी आणि २४ हजार ३३३ नॉन-बीटी अशी मिळून जवळपास २२ लाख १० हजार बियाणे पाकिटांची गरज भासणार आहे.
सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत. मागील तीन वर्षांत सुमारे २६ हजार ९७ हेक्टरवर असलेले क्षेत्र यंदा ४७ हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. त्यानुसार सुमारे २४ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय सुमारे ६ हजार २०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे आधीपासून उपलब्ध असल्याची माहिती आहे.
दरम्यान, कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी मक्याकडे वळत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मक्याखालील क्षेत्र सातत्याने वाढत आहे. यंदाही हा कल कायम राहण्याची शक्यता असून, सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टरवर मका लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे २६ हजार २५५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.









