---Advertisement---
जिल्ह्यात गत खरीप हंगामांतर्गत मान्सूनपूर्व आणि मान्सूनसह डिसेंबर ते सद्यस्थितीत मे महिन्या दरम्यान ‘बेमोसमी’ पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या प्रभावाने हजारो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान तीन लाख ४१ हजार १३७ शेतकऱ्यांना ४१२ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान नुकसानीनिमित्त वितरित झाले आहे. तर सप्टेंबर २०२४ ते मे २०२५ या दहा-अकरा महिन्यांदरम्यान एक लाख ५५ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार सुमारे १७० कोटी रुपयांची नुकसान मदत अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांदरम्यान झालेली अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, गारपीट वा वादळ वाऱ्यांमुळे शेतपिकांच्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार ११ जानेवारी २०२३, १० एप्रिल २०२३, ५ जून २०२३. ते १० डिसेंबर २०२४ शासन निर्णयानुसार ऑगस्ट २०२४ पर्यंत नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आले.
यात तीन लाख ४१ हजार १३७ शेतकऱ्यांना ४१२ कोटी ८३ लाख ५९ हजार ७७९ रुपये अनुदान मंजूर होते. त्यात लॉगिंगनुसार दोन लाख ७२ हजार ६०४ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ८९ लाख २८ हजार ९४१ रुपये अनुदानाची रक्कम वितरित झाली होती. तर सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ मध्ये एक लाख १४ हजार ७९९ हेक्टर ७७ आर क्षेत्रावरील एक लाख ५४ हजार ८२३ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसानीपोटी १६० कोटी ४५ लाख ५१ हजार रुपये मदत अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
जानेवारी २०२५ तसेच १८ मे दरम्यान आतापर्यंत सुमारे ७२३ गावांमधील १६ हजार ७४७ शेतकऱ्यांच्या १० हजार ४१२ हेक्टर ५३ आर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शासनाला अहवाल व नुकसान भरपाई अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा कृषी अधीक्षक तथा जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी म्हटले आहे.
नुकसानीची आकडेवारी धक्कादायक
जळगाव जिल्ह्यात सुमारे आठ लाख ५० हजार हेक्टर कृषी क्षेत्र असून साडेसात लाख हेक्टर क्षेत्र बागायती व जिरायत लागवडीखाली आहे. गेल्या दीड-दोन वर्षात शेतशिवारातील ‘बेमोसमी’ चे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले. नुकसानीची आकडेवारी पाहता कृषी व महसूल प्रशासनाला धक्का बसला आहे. एप्रिल २०२४ ते मे २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील एक हजार ८६१ गावामधील दोन लाख चार हजार ५०१ शेतकऱ्यांच्या एक लाख ४५ हजार ४८९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०२४ पासून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या अस्मानी संकटाने व्यापक स्वरूप धारण केले. एप्रिल २०२४ पासून झालेल्या अवकाळी पावसात सर्वाधिक कोरडवाहू पिकांना फटका बसला आहे. बागायत पिकांची कमी प्रमाणात हानी झाली असताना बहुवार्षिक पिकांची सर्वात कमी हानी झाली आहे.