‘मलबार’ नावाचे नवे राज्य बनवा , राज्याच्या विभाजनाची मागणी ! कोणी केली मागणी ?

नवी दिल्ली : केरळमध्ये सुन्नी युवजन संगम (एसवायएस) या मुस्लिम संघटनेने केरळचे विभाजन करून स्वतंत्र मलबार राज्याची मागणी केली आहे. भाजपने त्यावर आक्षेप घेतला असून त्यावरून सत्तधारी डाव्यांसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केरळमधील सुन्नी युवाजन संगमचे नेते मुस्तफा मुंडुपारा यांनी वेगळ्या मलबार राज्याच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला आहे. मलबारमधील शाळांमधील जागांच्या कमतरतेवर आयोजित केलेल्या निदर्शनात मुस्तफा बोलत होते. ते म्हणाले की, दक्षिण केरळ आणि मलबारमधील लोक समान कर भरतात, त्यामुळे त्यांना समान सुविधा मिळाव्यात.

मुस्तफा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण केरळ आणि मलबारमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्याय आहे. त्यामुळे वेगळ्या मलबार राज्याची मागणी करणे यात काहीही गैर नाही. त्यामुळे या मागणीला अलिप्ततावाद म्हणण्यात अर्थ नाही. मलबार राज्य झाले तर देशात काय फरक पडेल, असाही सवाल मुस्तफा याने विचारला आहे.

भाजपने या मागणीस तीव्र विरोध केला आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले की, पॉप्युलर फ्रंटवर बंदी घातल्याने केरळमधील अतिरेकी शक्तींचा नायनाट झाला असे कोणी मानत असेल तर ते चुकीचे आहे. केरळच्या विभाजनाची मागणी करणारे एसवायएस नेते मुस्तफा मुंडुपारा यांचा मनसुबा आणि मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांचे मौन हे कटू सत्य समोर आणते.

केरळमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष गुडघे टेकले असून मतांसाठी ते निर्लज्जपणे राष्ट्रीय अखंडतेशी तडजोड करत असल्याचा आरोप सुरेंद्रन यांनी केला आहे. त्याचप्रमाणे अशा राजकीय संघटना फुटीरतावादी शक्तींनी बळ देत आहेत. त्यामुळे केरळचे विभाजन करण्याच्या कोणत्याही हालचालीविरुद्ध भाजप पूर्ण ताकदीने लढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.