नागरिकांनो, आरोग्य सांभाळा : जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे इतके रुग्ण; जनजागृती गरजेची

जळगाव : वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळते. परीणामी आजारी रुग्णांची संख्याही वाढते. जिल्ह्यात जून महिन्यात १३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ८ रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रुग्णांवर जिल्हाभरात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून डेंग्यूचे हॉटस्पॉट निश्चित करून उपायोजना करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जळगाव तालुक्यात उन्हाळ्यात शिरसोली, वाघोदा, चाळीसगाव, जळगाव शहर आदी ठिकाणी डेंग्यूचा प्रार्दुभाव वाढला होता. मात्र त्यानंतर सध्यास्थितीत पावसाळ्यात डेंग्यूची रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य वभागाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी डेंग्यूबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात डेंग्यूची रुग्ण संख्येत वाढ होते. सद्यास्थितीत डेंग्यू तपासणी अहवाल पुणे, मुंबई याठिकाणी डेंग्यू रुग्णांच्या तपासणीचा अहवाल प्रयोग शाळेत पाठिवण्यात येतो. त्यामुळे रिपोर्ट येण्यास विलंब होतो.

त्वरीत रिपोर्ट प्राप्त झाल्यास रुग्णांना उपचार मिळणे शक्य होणार आहे. डेंग्यू रुग्णांना उपचार करण्यासाठी तपासणी अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयात डेंग्यू तपासणी प्रयोग शाळा सुरू होईल.