दाट धुक्याची चादर आणि शितलहरीने थंडीची लाट

तरुण भारत लाईव्ह । ७ जानेवारी २०२३। उत्तर भारतातील काही राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. पूर्व महाराष्ट्रात विदर्भाच्या बर्‍याच भागात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात बेमोसमी पावसाळी वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. आगामी एक दोन दिवसात तापमानात अजून घट होऊन गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. शहर व परिसरात गुरूवारी किमान तापमान 10 अंशवर गेल्याने थंडीने सर्वांनाच हुडहुडी भरली होती.

जिल्ह्यात शितलहर
जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी कमाल तापमानात 7 ते 8 डिग्री सेल्सिअसने घट झाल्यामुळे शितलहरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, मात्र किमान तापमानात सर्वसाधारण स्थिरता आहे. 5 ते 11 जानेवारी दरम्यान थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून किमान तापमान 9 ते 11 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या हवामानातील बदलाचा परिणाम दिसून येत आहे.
-निलेश गोरे, हवामान अभ्यासक, वेलनेस वेदर फाउंडेशन, भुसावळ.

दिवाळीनंतर उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवते. परंंतु यावर्षी दिवाळी होवूनही गुलाबी थंडीचे वातावरण तयार झाले नाही. त्यातच दिवसा तापमानाचा पारा 30 ते 31 अंशादरम्यान आक्टोबर हिटप्रमाणे तापमान होते. गेल्या दोन दिवसांपासून यात काहीसा बदल झाला असून गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. बुधवार सकाळपासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा 21 अंशादरम्यान होते. तर गुरूवारी देखील सूर्यदर्शन नसल्याने ढगाळ वातावरणासह तापमानाचा पारा कमाल 21 अंश तर किमान 9 ते 10 अंशापेक्षाखाली गेल्या असल्याचे दिसून आले आहे.

ढगाळ वातावरणासह बेमोसमी पावसाची शक्यता
जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे वातावरणातील गारठ्यात वाढ झाली असून सोबतच बेमोसमी पावसासह तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे. वाढण्याची शक्यता असून किमान 8 ते 10 अंशापर्यत तापमान राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.