Union Budget 2025 : ” केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला” उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गींना मोठं गिफ्ट दिलं. निर्मला सीतारमण यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प विशेष मानला जात आहे. यात शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेसह किसान क्रेडिटकार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.

अर्थसंकल्पात कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कर्करोग केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेला पाठिंबा देत कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कर्करोगाच्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी ही योजना चांगली असून आता कर्करोगासह इतर गंभीर आजारांवरील 36 औषधे ड्युटी फ्री केली आहेत. त्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळणार आहेत.

काय म्हणाले उपमुख्यामंत्री अजित पवार ?
सरकारच्या या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना ८० हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. २५ लाख उत्पन्न असलेल्यांचा कर १ लाख २५ हजारांनी कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.’

यासोबतच ‘औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार असल्याने आणि मोबाईल फोन देखील स्वस्त होणार असल्याने देशातील प्रत्येक घराला, व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे अजित पवारांनी नमूद केले आणि केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अजित पवारांनी आभार मानले आहेत.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे.