Devendra Fadnavis: जपान दौऱ्यास सुरुवात, काय आहे विशेष

मुंबई :  जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ दिवसांच्या जपान दौर्‍यावर रवाना झाले. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्‍यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनाही ते भेटतील.

जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय! राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौर्‍यात ते भेटी देणार आहेत. २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौर्‍यात त्यांचे भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. आपल्या या दौर्‍यात वाकायामा या शहराला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

यापूर्वी केला होता २०१५ मध्ये दौरा! 

राज्यात २०१४ मध्ये त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आल्यावर सप्टेंबर २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जपानचा दौरा केला होता. त्या दौर्‍यात ओसाका प्रांताला भेट दिली होती. जायकासोबत चर्चा केली होती. याकोहामा पोर्टला भेट दिली होती तसेच तेथील अनेक मंत्र्यांशी बैठका झाल्या होत्या.

जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-३, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर २०१७ मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता.