Mahaparinirvana Din 2024 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त उप मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Mahaparinirvana Din 2024 : देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामध्ये आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार आहे. त्यांनी दिलेले संविधान हे कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल श्री.शिंदे संबोधीत करीत होते.

कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा उपयोग आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हे विचार कुठेही कमी पडणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी पुढे सांगितले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार असणार आहे.  राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल.

ते पुढे  म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला बंधुता, एकता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.