मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या इशाऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी ‘फोर्स वन’चे 12 जवान तैनात करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी राज्याच्या यंत्रणांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्य पोलीस दल सतर्क झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेचा कसून आढावा घेण्यात आला असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान, नागपुरातील निवासस्थान आणि त्यांच्या कार्यक्रमालाही सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. अलीकडेच दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
त्यांची हत्या झाल्यापासून, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस राज्यातील हायप्रोफाईल लोकांच्या सुरक्षेची चौकशी करत आहेत. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी फोर्स वनचे १२ जवान तैनात करण्यात आले आहेत.