सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता लाच घेताना जाळ्यात, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

---Advertisement---

 

धुळे : विद्युत ठेकेदाराला दोन कोटींहून अधिक रकमेच्या अदा केलेल्या देयकाच्या मोबदल्यात सुमारे साडेआठ लाखांची लाच मागून तडजोडीअंती आठ लाख रुपये स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली.

तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून, दोंडाईचातील रहिवासी आहेत. त्यांना धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील २८ गावांमध्ये व पाड्यांवर एलईडी सोलर स्ट्रीट लाइट बसविण्यासाठी जीएसटी वगळता दोन कोटी ३७लाख २९ हजार ३५६ रुपयांची निविदा मंजूर झाली होती व कामाचा कार्यादेश मिळाल्यानंतर मार्च २०२५ मध्ये ४१ लाखांचे देयक निघाले होते. ते निघाल्याच्या मोबदल्यात तसेच उपअभियंता इंगळे यांनी ८० हजारांची लाच स्वीकारून उर्वरित ३० हजार रुपये पुढील देयकात द्यावे लागतील, असे सांगितले होते. तक्रारदाराला डिसेंबर २०२५ मध्ये दोन कोटी दोन लाख पाच हजार ५२५ रुपये बँक खात्यात देयकापोटी आल्यानंतरइंगळे यांनी देयक जमा केल्याच्या मोबदल्यात साडेआठ लाखांची लाच मागितली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. उपअभियंता इंगळे यांना धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात आल्यानंतर आठ लाखांची लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.

ही कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृवात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---