तरुण भारत लाईव्ह । ३० एप्रिल २०२३। एखाद्या स्त्रीला मातृत्वाची चाहुल लागताच जो आनंद होतो तो शब्दातीत असतो. आई होणं हा जगातला सर्वात सुंदर अनुभव असतो. पण नियती हा आनंद, हा अनुभव काही जणींच्या बाबतीत हिरावून घेते. खूप उपाय करूनही एखाद्या स्त्रीला डॉक्टर जड अंतःकरणाने सांगतात की, तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही, त्यावेळी पायाखालची जमीन सरकते. हा धक्का पचवण्यासाठी, मानसिक स्थिती सावरण्यासाठी बराच अवधी लागतो. अशावेळी ज्याच्या भरवशावर आपण सर्वस्व अर्पण केलेले असते त्या पतीचा त्याचबरोबर सासरच्या लोकांचाही आधार महत्त्वाचा असतो.
आजकाल लग्नाला चार-पाच वर्षे होऊनही मातृत्वाची चाहुल लागली नाही तर दत्तक हा पर्याय निवडला जातो. खरंतर दुसर्याचं मूल आपले म्हणून स्वीकारायला मोठे मन लागते. पण आपण आई-बाबा होणार, आपलं हक्काचं मूल असणार, आपल्याला आई-बाबा म्हणणार हा आनंद पण आभाळाएवढा असतो. केतन आणि श्रद्धा यांनीही ऋचा या सहा महिन्याच्या गोड मुलीला घरी आणले. श्रद्धाचे वात्सल्याचे बहरलेले कोवळे मन हळवे झालेले होते. ती तर तान्हुलीला कवटाळत मातृत्वाचे सुख अनुभवत होती. घर अगदी आनंदाने भरून गेलं होतं. ऋचाच्या बाललीला पहात दिवस लहान वाटू लागला.
केतनला भरपूर पगार होता. दोन मोठे बंगले होते. आई-वडिलांचा एकुलता एक होता. पैशांची कमी नव्हतीच. अशा घरात ऋचाचे भरपूर लाड होत होते. लहानपणीचे उत्स्फूर्त स्वच्छंदी बालपण संपून ऋचाने आता तारुण्यात पदार्पण केले होते.नुकत्याच झालेल्या 23व्या वाढदिवसाला बाबांनी तिच्या आवडीचा सगळ्यात महागडा मोबाईल घेऊन दिला होता. लग्नाचं वय तसं झालं होतं. पण अजून दोन-तीन वर्षांनी बघू, असं ऋचा म्हणाल्याने सध्या तो विषय नव्हता.
सगळं सुरळीत सुरू होतं. एका रात्री श्रद्धाला जाग आली. रात्रीचा एक वाजला होता. त्यावेळी ऋचा मोबाईलवर चॅटिंग करताना आढळली. श्रद्धाने मुद्दाम दुर्लक्ष केलं. तिला काहीच बोलली नाही. फक्त झोप आता पुरे झालं मोबाईल पहाणे. ऋचा पण निमूटपणे फोन ठेवून झोपी गेली. श्रद्धाची मात्र झोप उडाली होती. तशी तर तिला कधीची शंका येत होती. पण आपल्या मुलीवर तिचा विश्वासही होता.
खरंतर बर्याच दिवसापासून ऋचा मैत्रिणीचा फोन आहे, असे म्हणून लांब जाऊन हळू आवाजात बऱाच वेळ बोलत असायची. पण काल केलेले मेसेज डिलीट न करताच ती झोपल्याने सकाळी ती उठायच्या आत श्रद्धाने मोबाईल पाहिला आणि सगळा भांडाफोड झाला. शंका खरी ठरली होती.
मग तिला विचारल्यावर खूप घाबरली होती. मग उडवाउडवीची उत्तरे देणे, रडणे, श्रद्धाचे रागावणे, तिच्याकडून वदवून घेणे, कधीपासून हे प्रकरण सुरू आहे? कुठे भेटला तो? सांगितले का नाही? खोदून-खोदून विचारल्यावर तिने कुठे ओळख झाली, कुठे आणि किती वेळा भेटलो, हे एकदाचे सांगितले.
ऋचाच्या अशा वागण्याने केतन आणि श्रद्धा पार कोलमडून गेले. ती ज्या मुलाशी बोलत होती त्याच्या प्रेमात नव्हे, आकर्षणात ती आकंठ बुडाली होती. फक्त तीन-चार महिन्याच्या ओळखीतच त्याने तिच्यावर मोहिनी घातली होती. हे वय असतंच तसं. फारसं कळत नसतं. आई-वडिलांपेक्षा तो मुलगाच तिला जास्त जवळचा वाटू लागतो. ऋचाला श्रद्धा खूप बोलत होती. संतापाने रागावत होती. ऋचाही रागाने म्हणाली, बोल मला किती बोलायचं. तसाही तुझा माझा संबंध काय ग? तशीही तू माझी खरी आई नाहीच. या वाक्याने मात्र श्रद्धाला प्रचंड वाईट वाटले. आपण आई म्हणून कमी पडलो असे तिला वाटले. भयंकर त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा. रागाच्या आवेशात ऋचा बोलली असणार. पण कुठेतरी हे वाक्य हृदयात कोरले गेले आणि वाटून गेलं आपली खरी मुलगी असती तर असं बोलू शकली नसती. मनात विचार आला, मातृत्वाचे दान प्रत्येक स्त्रीला मिळायला हवं. पण काही गोष्टी या नियतीच्या हातात असतात. पण जरी देवकी होता आलं नाही तरी यशोदा होऊन त्या बाळाला तेवढंच प्रेम, वात्सल्य देऊन घडवता येतं. संस्कार करता येतात.
या संस्कारात आपण कुठे कमी पडलो असं वाटून तिची उलघाल सुरू झाली. तिने आजवर दिलेली माया, घेतलेले कष्ट, केलेली धावपळ, काढलेली आजारपण तिने एका क्षणात मातीमोल केली. नियतीने तिला यशोदा होण्याचा आनंदही पूर्ण उपभोगू दिला नव्हता. एका क्षणात तिची कूस पुन्हा नियतीने पोरकी केली होती.
विशाखा देशमुख
९३२५३५३१९८