Devagiri Short Film Festival : चित्रपटातून सवेदना व्यक्त होतात. त्यातील अभिनय काया, वाचा आणि मनाशी जोडलेल्या असतात. त्यामुळे चित्रपटातील संवेदना महत्वाची असून त्याला भाषेची मर्यादा नसते. ज्या भाषेचे आपल्याला ज्ञान नाही, त्या भाषेतील चित्रपट सुद्धा आपल्या मनाला स्पर्श करून जातो, आपल्याला आवडतो डॉ. जयंत शेवतेकर यांनी सांगितले.
देवगिरी चित्र साधना आयोजित देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टीवल दरम्यान एका सत्रामध्ये डॉ. शेवतेकर यांनी आपले विचार प्रकट केले. सुसंवादक प्रा. रत्नाकर गोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांच्या अनेक प्रश्नांचे समाधानही त्यांनी यावेळी त्यांनी केले. ते नाट्य शास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक असून नाट्य शास्त्रात अनेक प्रावीण्य त्यांनी प्राप्त केले आहे.
डॉ. शेवतेकर म्हणाले,“भूमिका: स्वतःचे विचार, मानसिकता, वैयक्तिक आयुष्य यातून बाहेर पडून व्यक्तिरेखा सादर करणे आवश्यक असते. तरच अभिनयाला योग्य न्याय देता येतो. चित्रपटातून जे दाखवले जाते ते स्वीकारले पाहिजे. नाहीतर चित्रपटाचा आस्वाद घेता येणार नाही. प्रत्येकाचं रसग्रहण सारखेच असेल असे नाही. रसग्रहण करताना कलेतील चांगल्या वाईट सर्वच गोष्टींचा विचार केला पाहिजे. लोकमताच्या प्रभावामुळे आपले मत तयार व्हायला नको, असे ते म्हणाले.
तसेच, ग्रामीण भागातील कलाकारांना मार्गदर्शन करताना डॉ. शेवतेकर म्हणाले, “कलाकारांनी कोणताही संकोच न करता आपली कला जगासमोर आणायला हवी. कोणतीही कला सहज सादर होत नाही. त्यामागे अनेकांनी कष्ट घेतलेले असते. ग्रामीण भागातील कला, संस्कृती, अभिव्यक्ती बाहेर आली पाहिजे. ग्रामीण भागातील कलाकारांनी संकोच सोडायला हवा. आपली कला आत्मविश्वासाने समोर आणायला हवी. सध्या चित्रपटातून बऱ्याचदा काही गोष्टी लादल्या जातात. जे पटले नाही ते व्यक्त करता आले पाहिजे, जे आवडले ते स्वागत केले पाहिजे.
तसेच, चित्रपट कला सुद्धा अभिजात कला आहे आणि मनोरंजन आणि प्रबोधन यांचा सुवर्णमध्य म्हणजे चित्रपट असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शॉर्ट फिल्म बनवायची असेल तर आधी उत्तम बघीतली पाहिजे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील
शॉर्टफिल्म करायची असेल, तर आधी शॉर्टफिल्म पाहायला शिकलं पाहिजे. आपण प्रगल्भ झालो, अनेक विषयांना स्पर्श केला तर आपल्या कल्पना विस्तार होईल असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक व खान्देश भूमीतील सुपुत्र शिवाजी लोटन पाटील यांनी केले. त्यांनी जळगांव येथे तृतीय देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टीवलच्या मास्टर क्लास मध्ये मार्गदर्शन केले.
सुसंवादक वीरेंद्र पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांच्या अनेक प्रश्नांचे समाधानही त्यांनी यावेळी त्यांनी केले. देवगिरी चित्र साधना आयोजित देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टीवल दरम्यान मास्टर क्लास मध्ये ‘कथा निवड आणि दिग्दर्शन’ या विषयावर त्यांनी आपले विचार प्रकट केले. ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक असून भोंगा, धग, हलाल, 31 ऑक्टोबर, वाजवूया बँड बाजा यासारखे उत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे.
शिवाजी पाटील म्हणाले, “जगाचं भान ठेवून शॉर्ट फिल्म व्हायला हवी. सध्या राज्यात, देशात काय सुरुय, लोकांचा कल कुठंय हा विचार करून फिल्म झाली पाहिजे, मग ती यशस्वी होते. शॉर्टफिल्म हा चित्रपटपेक्षा अवघड विषय आहे. यामध्ये कमी वेळेत मोठा आशय मांडायचा असतो. म्हणून प्रतिष्ठित शॉर्टफिल्म पाहायला पाहिजे. त्यामधून शिकायला मिळते. तसेच, विषय निवडताना किंवा कथा निवडताना आपल्या जवळच्या किमान दहा लोकांना ऐकवा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घ्या मग निर्णय करा. आवश्यकतेनुसार बदल करा असे त्यांनी सांगितले.
उपस्थित तरुण कलाकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “शॉर्टफिल्म करताना शक्यतो स्वत:ची कथा असावी. दुसऱ्याची घेतली तर लेखक सोबत योग्य समन्वय झाला पाहिजे. पटकथा लिहिणे अवघड काम नाही. पुस्तक वाचताना दृश्य डोळ्यासमोर येऊ लागते तेव्हा पटकथा तयार व्हायला सुरुवात होते.
मराठी चित्रपट सृष्टीबद्दल बोलताना ते म्हणाले, मराठी चित्रपट गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी नाही, आर्थिक गणित न जुळल्यामुळे आपण मागे पडतो. मराठी चित्रपटांचा कंटेंट आजही सर्वात जास्त दर्जेदार व अर्थपूर्ण आहे. शिवाय आजकाल मार्केटिंग महत्वाचा फॅक्टर आहे. लोकांच्या मनावर जे जास्त बिंबवले जाते ते लोक जास्त बघतात. त्यामुळे चित्रपट सुरू होण्यापासून थेटरमध्ये दिसण्यायर्यंत काहीना काही प्रयत्न करावेच लागतात.
भारत आणि भारतीय संस्कृती बळकट करणारे चित्रपट तयार व्हावे : डॉ.भरत अमळकर
चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय समाजमनावर आघात करण्यात आले, विविध कलाकृतींच्या माध्यमातून समाजमन डळमळीत करण्याचे विघातक हेतूने प्रयत्न करण्यात आले. कुटुंब संबंध टोकावर येऊन बसले आहेत. समाजातील ही आव्हाने पाहता भारत आणि भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था बळकट करणारे चित्रपट तयार होणे काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन डॉ. भरत अमळकर यांनी केले. जळगांव येथे तृतीय देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
देवगिरी चित्र साधना आयोजित तिसरा देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवल 27 व 28 जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात झाला . फेस्टिवलसाठी 109 शॉर्टफिल्म आल्या असून विशेष 62 शॉर्टफिल्म दाखवल्या छ्त्रपती संभाजीनगर येथील नाट्य शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. जयंत शेवतेकर यांनी चित्रपट रसग्रहण या विषयात मास्टर क्लास दरम्यान मार्गदर्शन केले, तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी पटकथा व दिग्दर्शन या संदर्भात मार्गदर्शन केले.
खानदेश दिग्गज कलाकारांची भूमी, फेस्टिवलमुळे नवीन कलाकारांना योग्य दिशा मिळेल – सुरभी हांडेफेस्टिवल प्रसंगी जळगावच्या भूमीकन्या जय मल्हार मालिका फेम सुरभी हंडे उपस्थित होत्या. जळगाव आणि विवेकानंद शाळेने मला सर्वप्रथम कला शिकवली. माझी कला याच मंचावर फुलली. जळगाव आणि खान्देशच्या भूमीतून कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तयार झाले. येथे नवख्या कलाकारांना व्यासपीठ मिळणं गरजेचं होतं. देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टीवलने ही कमी पूर्ण केली आहे, असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.