मुंबई । उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून मात्र महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्ह्णून कोण शपथ घेणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. यातच आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे हजर होते. यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले.
त्यानंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा वेग वाढला आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजच सत्ता स्थापनेचा दावा
देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी हे भाजपचे दोन्ही निरीक्षक राजभवनावर शिष्टमंडळासोबत जाण्याची शक्यता आहे.